Electric transformer : अहमदनगर (DSNews24/ सतिश फापाळे) अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावच्या हद्दीत मोघाडवाडी जवळील बालाजी स्टोन क्रेशवरील लाईट कनेक्शन कट करून ट्रान्सफॉर्मर खाली उतरवून त्यातील ऑईल सोडून दिले. तर ट्रान्सफॉर्मर खोलून त्यातील ४८० किलोची तांब्याची तार काढून घेत अज्ञात चोरट्यांनी एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल गुंडाळून पोबारा केल्याची घटना गुरूवार दिनांक २ मार्च रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
पठार भागातील बेलापुर गावच्या हद्दीत गट नंबर २७७ मध्ये आळेफाटा येथील व्यापारी विकास नारायण आंधळे यांचे मालकीचे बालाजी स्टोन क्रेशर आहे. येथे त्यांनी नेमलेले कामगार स्टोन क्रेशर चालवतात. परंतु बुधवार दिनांक १ मार्च रोजी रात्री ११:४५ वाजताच्या सुमारास स्टोन क्रेशर वरील लाईट अचानक गेली.लाईट गेल्याने कामगार झोपण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांनी ट्रान्सफॉर्मर पहिला होता. तेव्हा तो ठीक होता.आणि लाईट आलीच नाही या कारणाने सर्वजण झोपी गेले होते.
गुरूवार दिनांक २ मार्च रोजी सकाळी सहा वाजता येथील कामगार सुनील मेंगाळ क्रेशरवर गेला असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर खाली उतरवून त्यातील ऑईल सोडून दिले होते.तर ट्रान्सफॉर्मर खोलून त्यातील तांब्याची तार काढून नेली होती.असा फोन कामगार सुनील मेंगाळ यांनी मालक विकास आंधळे यांना केला.तर यात चोरीत १,३०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेल्याने बालाजी स्टोन क्रेशरची मोठी नुकसान झाली आहे.
व्यापारी विकास आंधळे यांचे फिर्यादीनुसार अकोले पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यान विरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल किशोर तळपे करत आहे.
यादरम्यान पठार भागात भुरट्या चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. शासकीय ,तसेच शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे चोरीच्या घटनांनी मोठे नुकसान होत आहे.अनेक छोट्या मोठ्या चोरीच्या घटना वाढत आहे. वाढत्या चोऱ्यांनी पठार भागात चोरांची दहशत निर्माण झाली.तर अकोले पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करून त्यांच्या लवकरात लवकर मुसक्या आवळाव्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.
