पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. शरद पवार यांनी तीच मागणी केली आहे. आम्ही पवारांच्या या भूमिकेशी सहमत आहोत.
राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केला असेल, जो मंत्री भ्रष्टाचारी आहे त्याची चौकशी झालीच पाहिजे. सेंट्रल एजन्सी आणि स्टेट एजन्सीकडून या भ्रष्टाचाराची चौकशी केली पाहिजे, असं सांगतानाच देश बुडव्यांच्या हाती महाराष्ट्र गेल्याने राज्य सरकार बरखास्त करा, अशी मागणीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
पंतप्रधान मोदींनी भोपाळमध्ये राष्ट्रवादीवर जोरदार तोफ डागली. देश बुडवणाऱ्यांपासून सावध राहा असं त्यांनी सांगितलं. आर्थिक गुन्हेगार असं त्यांना म्हणायचं असेल. ज्यांनी देशाचा पैसा लुटला, बँका बुडवल्या हे सर्व देश बुडवे आहे.
पण त्यातील काही देश बुडव्यांना भाजपनं सोबत घेतलं आणि मंत्रीपदाची शपथ दिली आहे. महाराष्ट्राचं सरकार देशबुडव्यांच्या हाती गेलं आहे. पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे हे सरकार बरखास्त करा किंवा या देश बुडव्यांवर पंतप्रधान सांगतात त्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत म्हणाले.
