शिवसेनेच्या ठाकरे गटाने आगामी लोकसभेसाठी शिर्डीतून उमेदवार शोधला असल्याचे पुढे येत आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे यांनी नुकतीच मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. भाजपला रामराम करत ते लवकर हाती पुन्हा एकदा शिवबंधन बांधणार आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांनी २००९ मध्ये काँग्रेस आघाडीचे रामदास आठवले यांना पराभूत केले. शिवसेनेकडून ते खासदार म्हणून निवडून आले होते.
दरम्यान, वाक्चौरे यांनी २०१४ मध्ये अचानक काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र, मोदी लाटेत शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे शिर्डीचे खासदार झाले. लोकसभेला पराभूत झालेले वाकचौरे यांनी भाजपत प्रवेश करत श्रीरामपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली.
मात्र त्यातही ते पराभूत झाले. त्यानंतर काहीसे राजकीय अज्ञातवासात असलेले वाकचौरे बदलत्या राजकीय समीकरणात पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची गेल्याच आठवड्यात भेट घेतली आहे.
वाकचौरे हे लवकरच हाती शिवबंधन बांधणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यांच्या उमेदवारीला बाळासाहेब थोरात आणि गणेश कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने नाराज असलेला भाजपचा एक गट यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.
या राजकीय परिस्थितीत भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावाला जिल्ह्यातील नेत्यांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीचा आणि लवकरच हातात शिवबंधन बांधणार असल्याच्या घडामोडींच्या चर्चेला वाकचौरे यांनीही दुजोरा दिला आहे.
