मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळणार…?

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह गेलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठी फूट पडली असून अजित पवार यांच्यासह बहुतांश आमदार शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत.

इतकंच नाही तर आम्हीच राष्ट्रवादी असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या हातातून पक्षाचे नाव आणि चिन्ह जाणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे विश्वासू जयंत पाटील यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. शिवसेनेप्रमाणेच आमचंही पक्षचिन्ह जाईल, अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं, तेच राष्ट्रवादीच्या बाबत घडलं तर वावगं नाही, असंही ते म्हणाले.

आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह जाईल, असं वाटत असल्याचंही जयंत पाटील म्हणाले. असं जर झाल्यास आम्ही शिवसेनेसारखा परत नव्याने आम्ही संघर्ष करू, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या या विधानामुळे घड्याळ पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव शरद पवार यांच्या हातातून जाणार का? अशीही चर्चा रंगली आहे.

Leave a Comment