राज्यासह देशभरात होळी आणि धुळवडीची मोठी धूम पाहायला मिळत आहे. अगदी सर्वसामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटी, नेते मंडळी होळी आणि धुळवडीचा आनंद लुटला.
यातच राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अलीकडेच अपक्ष म्हणून निवडून आलेले काँग्रेसचे बंडखोर आमदार सत्यजित तांबे(Satyajit Tambe) यांनी होळीनिमित्त काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना एक खास सल्ला दिला आहे.
होळीनिमित्त राहुल गांधींना काय शुभेच्छा द्याल, असा प्रश्न सत्यजित तांबे यांना विचारण्यात आला होता. यावेळी सत्यजित तांबे यांनी, राहुल गांधींना होळीच्या शुभेच्छा देताना एवढेच सांगेन की, राहुलजींनी आणखी लोकांमध्ये मिसळून काम करायला हवे. भारत जोडो यात्रेतून त्यांनी हे केलेच आहे. पण अजून त्यांनी लोकांमध्ये मिसळले पाहिजे. लोकांमध्ये आले-गेले पाहिजे. यामुळे लोकांच्या मनातील कटू भावना दूर झाल्या पाहिजेत, असे सत्यजित तांबे म्हणाले.
बुरा न मानो होली है!
एका वृत्त वाहिनीशी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, विरोधक असो वा सत्ताधारी असो, एकत्र येऊन त्यांनी या देशासाठी कसे चांगले काम करता येईल, हे आताच्या पिढीतील लोकांना पाहायचे आहे. भाजपने काय केले? हे ऐकण्यात आता कुणालाही रस राहिलेला नाही. आपण काय करणार आहोत? पुढे तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय करणार आहात? हे ऐकण्यात देशातील जनतेला खऱ्या अर्थाने रस आहे. मला असे वाटते की जुने ते सगळे सोडून आपण काय करू शकतो, यावर त्यांनी काम करायला हवे, असं मला वाटते. बुरा न मानो होली है!, असे सत्यजित तांबे यांनी नमूद केले.
