Maharashtra Rain : राज्यात पावसाचा मुक्काम वाढला

Maharashtra Rain : जुन महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसानं थेट ऑगस्टपर्यंत सुट्टी घेतली आणि अखेर सप्टेंबर महिन्यात तो असा काही परतला की हवामान विभागानं थेट या पावसाचा मुक्काम आता वाढल्याचीच माहिती दिली.

सोमवारपासून पावसानं राज्यात पुन्हा जोर धरला आणि कोकणापासून विदर्भापर्यंत तो अधूनमधून बरसत राहिला. मंगळवारी गणेश चतुर्थीच्या दिवशीही असंच चित्र पाहायला मिळालं. ज्यानंतर आता पुढचे काही दिवसही राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची संतताधर सुरुच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे, पालघरमध्येही ढगाळ वातावरण असेल. तर, काही ठिकाणी पाऊस उघडीप देणार आहे. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी पावसाचीही सोय करूनच निघणं उत्तम असेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काळात परतीच्या पावसाचा प्रवास ऑक्टोबरच्या मध्यापासून सुरु होईल.

तोपर्यंत राज्यात कमी दास्त प्रमाणत विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावताना दिसणार आहे. मराठवाड्यावर मात्र सध्या पावसाची वक्रदृष्टी झाल्याची चिन्हं आहेत.

कारण, इथं नांदेड, लातूर आणि हिंगोली वगळता उर्वरित भागामध्ये खरिपाच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं त्याचा परिणाम कमी दाबाच्या पट्ट्याच्या निर्मितीमध्ये होत आहे. ज्यामुळं 22 ते 24 सप्टेंबर या दिवसांत राज्यात विदर्भ आणि कोकणावर पावसाची कृपा होऊ शकते. 22- 23 सप्टेंबरला जालन्यापासून बीडपर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी असेल.

Leave a Comment