कल्याण – नगर महामार्गावर भरधाव कारने ५ शेतमजुरांना चिरडले

कल्याण – नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलालगत भरधाव येणाऱ्या कारने परप्रांतीय पाच मजुरांना चिरडल्याची थरकाप उडविणारी घटना घडलीय.

यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून एकाचा उपाचरादरम्यान मृत्यू झालाय. जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण शेतमजुर असल्याची माहिती समोर आली आहे.

जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या तिघांची नावे असून गाडीचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

नगर – कल्याण महामार्गावर दोन ते तीन दिवसांपूर्वीच डीगोरे परिसरात पाच शेतमजूर मध्यप्रदेश येथून आले होते. रविवारी संध्याकाळी शेतातील कामे उरकून पायी घरी जात असताना महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने या पाच मजुरांना जोरात धडक दिली त्यात ते चिरडले गेले. त्यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. हे सर्वजण घरी जात असताना ही दुर्देवी घटना घडली आहे.

Leave a Comment