पुणे जिल्ह्यातीन खेड तालुक्याच्या सेझ मधील कंपनीची ठेकेदारी स्पर्धा एका तरुण ग्रामपंचायत सदस्यासाठी जीवघेणी ठरली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून कनेरसर ग्रामपंचायतीच्या तरुण सदस्यची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
तरुणाच्या चेहरा आणि डोक्यात अनेक वार करत हा खून करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगारांनी हा खून केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यातील कनेरसर येथील रहिवासी 35 वर्षीय संतोष रामदास दौंडकर असे खुन झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. संतोष रामदास दौंडकर यांचा खेड तालुक्यातील सेझ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात बहुतांशी कंपन्यांमध्ये क्रेन पुरवण्याचा व्यवसाय आहे. कमी कालावधीत संतोष दौंडकर यांनी आपल्या व्यवसायात चांगला जम बसवला होता त्याच स्पर्धेतून संतोषच्या खुनाचा प्रकार घडला असा अंदाज व्यक्त होत आहे.
संतोष दौंडकर हे शुक्रवार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी कंपनी गोडाऊन जवळ असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. यावेळी प्रतिकार करत असताना त्यांचा उजव्या हाताचा पंजा तुटून जागेवर पडला.
त्यानंतर संतोष हे बचाव करण्यासाठी पळत असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून त्याच्या तोंडावर व डोक्यावर अनेक वार करत त्यांचा खून केला. संतोष यांचा मृतदेह आढळला त्या ठिकाणापासून दोनशे फुट अंतरावर त्याच्या उजव्या हाताचा पंजा सापडला. दरम्यान, खेड पोलीस स्टेशनचे निरिक्षक राजकुमार केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.
