महायुतीच्या नऊ मंत्र्यांची हकालपट्टी होणार

राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे घोटाळेबाज लुटमार करणारे आहे, असा आरोप करत येत्या काही दिवसांत या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पण मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेनंतर ज्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केले आहेत, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, अशा नऊ मंत्र्यांची हकालपट्टी होणार असल्याचा गौप्यस्फोट विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

त्या मंत्र्यांची नावे आताच सांगू शकत नाही; पण सरकारने या भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी केली नाही, तर आम्ही त्यांचे घोटाळे जनतेसमोर मांडणार, असा इशाराही त्यांनी दिला.

संताजी घोरपडे साखर कारखान्यातील मनी लाँडरिंग प्रकरणात पीएमएलए न्यायालयाने मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवतानाच नऊ मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागणार असल्याचा दावा केला आहे.

ते म्हणाले, मुश्रीफ यांच्याबाबत पीएमएलए कोर्टाचे गंभीर स्वरूपाचे निरीक्षण आहे. या निरीक्षणातून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुश्रीफ यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, १६ अपात्र आमदारांवर कारवाई होणारच आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Leave a Comment