शेवगाव : शेतीपंपाना रात्रीच्या वेळी करण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे वडुले खुर्द(ता.शेवगाव )येथील दोघांचा बळी गेला आहे. कांद्याच्या रोपाला पाणी देण्यासाठी गेलेल्या आजोबा आणि नातवाचे वीजेच्या धक्क्याने निधन झाले आहे.
निवृत्ती टोपा आव्हाड(वय-७८) व दिपक सोपान पाखरे (वय-२६)असे या घटनेतील मयत आजोबा व नातवाचे नाव असून या त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत समजलेली हकीकत अशी की,वडुले खुर्द येथील कोपरे रस्त्यानजीक वस्तीवर राहणारे वयोवृध्द शेतकरी निवृत्ती आव्हाड शेतीपंपाना रात्रीचा वीजपुरवठा असल्याने कांद्याच्या रोपांना पाणी देण्यासाठी सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास गेले होते. मात्र तेथून गेलेल्या वायरमधील विद्युतप्रवाह जमीनीवर पडलेल्या तारेत उतरलेला असल्याने वीजेच्या जोरदार धक्का त्यांना बसला.
ते जोराने ओरडताच त्यांचा आवाज वस्तीवर गेला.तेव्हा त्यांच्या पत्नीने ते राहणाऱ्या त्यांच्या मुलीचा मुलगा दिपक पाखरे यास झोपेतून उठवून शेतात जाऊन पाहण्यास सांगितले. वीजप्रवाहाची कल्पना न आल्याने तो तेथे जाऊन आजोबांना उठविण्याचा प्रयत्न करत असताना त्यालाही वीजेचा धक्का बसला.
त्यातच दोघांचेही निधन झाले. नंतर परिसरातील ग्रामस्थ व कुटुंबातील व्यक्ती तेथे जमा होऊन वीजपुरवठा खंडित करण्यात आला.त्यानंतर आज दोघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.मयत दिपक विवाहित असून पाठीमागे पत्नी व मुलगी असा परिवार आहे.
