मुंबईत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता, मुसळधार पावसाचा इशारा 

पुढील काही दिवसांत मुंबईत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यताही वर्तवली जात आहे. मागच्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांतील हवामानात मोठा बदल होत आहे.

केरळ, तामिळनाडूमध्ये गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाला आहे. तर, बुधवारी 18 ऑक्टोबरला राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 21 ऑक्टोबरला मुंबईसह गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागांमध्ये चक्रीवादळ धडकणार आहे. अरबी समुद्रतील पश्चिम-वायव्य दिशांना येणाऱ्या या वादळामुळे नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय समुद्रात कोणीही न उतरण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

येत्या 21 तारखेपासून मुंबईसह किनारी भागांमध्ये सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनानेदेखील किनारी भागांत उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

 

या भागांत पावसाची शक्यता

महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी यला मिळतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ठाणे, मुंबईत उकाडा जाणवणार आहे. याशिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्यानं सांगितलं की, राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. यासोबतच कर्नाटक आणि तामिळनाडूच्या किनारी भागातही पावसाची शक्यता आहे.

 

‘तेज’ चक्रीवादळ धडकणार?

पुढच्या 36 तासांमध्ये अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार असून त्यामुळे वादळी वाऱ्यासह गुजरात, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये पावसाची शक्यताही वर्तवली आहे. या चक्रीवादळाला भारताकडून तेज चक्रीवादळ असं नाव देण्यात आलं आहे.

Leave a Comment