क्रिकेट विश्वावर शोककळा, भारताच्या महान दिग्गज खेळाडूच निधन

भारतीय संघाचे माजी फिरकीपटू बिशनसिंह बेदी यांचं निधन झालं आहे. ते ७७ वर्षांचे होते. आपल्या कारकिर्दीत बिशनसिंह बेदी, इरापली प्रसन्ना, वेंकटराघवन आणि भागवत चंद्रशेखर ही भारताची फिरकी चौकडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगलंच नावाजलेलं होतं.

१९६७ ते १९७९ या कालावधीत बिशनसिंह बेदी यांनी भारताकडून ६७ कसोटी सामने खेळले. ज्यात त्यांनी २६६ बळी घेतले. याव्यतिरीक्त त्यांच्या नावावर १० वन-डे सामन्यांमध्ये ७ बळीही जमा आहेत.

१९७५ साली खेळवण्यात आलेल्या पहिल्या वन-डे विश्वचषकात बेदी यांच्या भेदक माऱ्यामुळे भारतीय संघाने आपला पहिला विजय नोंदवला होता. इस्ट आफ्रिका संघाविरोधात बेदी यांनी १२ षटकांत अवघ्या ६ धावा देत १ बळी घेतला होता. महत्वाची बाब म्हणजे यातील ८ षटकं ही निर्धाव होती.

बिशनसिंह बेदी यांचा जन्म अमृतसरचा. परंतु स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी दिल्लीचं प्रतिनिधीत्व केलं. स्थानिक क्रिकेटमध्ये ३७० सामन्यांमध्ये १५६० बळी ही त्यांची कामगिरी आजही सर्वोत्तम आहे.

बेदी यांच्याच नेतृत्वाखाली दिल्लीने १९७८-७९ आणि १९७९-८० या सलग दोन रणजी हंगामाचं विजेतेपद पटकावलं होतं. तसेच बेदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ रणजी करंडक स्पर्धेत सलग दोनवेळा उप-विजेता राहिला होता.

त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकल्यानंतर क्रिकेट जगतातील सर्व खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे.

Leave a Comment