गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याकडून मोठी माहिती समोर येत आहे.
25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर राजस्थानमध्ये पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात, असं हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे.
राजस्थानमध्ये पेट्रोल किमान 11.80 रुपयांनी स्वस्त होईल. जयपूरमध्ये एका निवडणूक कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले, “राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आल्यास राज्यात काय बदल घडेल, असा प्रश्न मला विचारला जात आहे.
सर्वप्रथम माझा विश्वास आहे, की भाजप पुढे आहे. इथे सरकार स्थापन करण्याचा निर्धार आहे आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर राजस्थानमध्ये पेट्रोलच्या किमती देशाच्या इतर भागांच्या बरोबरीने आणण्याचं काम करू (विरोधक शासित राज्ये वगळता). आम्ही निवडून आलो तर राजस्थानमध्ये पेट्रोल किमान 11.80 रुपयांनी स्वस्त होईल.”
