नगर – दौंड महामार्गावर अरणगाव शिवारात मेहराबाद भुयारी पुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीने सुझुकी अॅक्सेस मोपेडला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोपेड वरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२०) मध्यरात्री १२ ते १२.३० च्या सुमारास घडली.
साहिल कैलास नेटके (वय १८) व अनिकेत बंडू साठे (वय १७, दोघे रा. वाळकी, ता. नगर) असे मयत युवकांची नावे आहेत. हे दोघेजण सुझुकी अॅक्सेस मोपेडवर एका धार्मिक कार्यक्रमासाठी वाळकी येथून केडगाव येथे गेले होते.
तेथून एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जावून रात्री १२ च्या सुमारास ते नगर दौंड महामार्गाने वाळकी कडे जात होते. अरणगाव शिवारात मेहराबाद येथील भुयारी पुलाजवळ ते आलेले असताना एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगात आली आणि त्या गाडीने यांच्या मोपेडला जोराची धडक दिली.
या धडकेत दोघेही रस्त्यावर पडून गंभीररित्या जखमी झाले. या अपघातानंतर त्यांचा मित्र संदेश अरवडे याने व इतर लोकांनी रुग्णवाहिका बोलावून त्या दोघांना रात्री १.१० च्या सुमारास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघेही मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
