विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) आजपासून नागपुरातून(Nagpur) सुरुवात होणार आहे. आजपासून पुढचे 10 दिवस महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातलं वातावरण तापणार आहे.
पुढचे 10 दिवस नागपूर राजकीय घडामोडींचं केंद्र असेल. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप या सर्व विषयांवर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.
या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करतं का? आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काही निर्णय घेतं का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
कसं असेल पहिल्या दिवसाचं कामकाज?
सुरुवातीला अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अध्यादेश 2023 (दुसरी सुधारणा) (वित्त विभाग)
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023( उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग)
महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक 2023(गृहनिर्माण विभाग)
सन 2023-24 च्या पुरवण्या मागण्या सादर केल्या जातील. – शासकिय कामकाज
त्यांनंतर शोकप्रस्ताव सादर केला जाईल
