दिल्ली (DSNews24 ) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. राज्यात या प्रश्नावर विरोधी पक्षांसोबत शेतकरी संघटनांनी आंदोलने तीव्र केली आहेत.
आता राज्यातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या खासदारानेही दिल्लीत गळ्यात कांद्याची माळ घालून निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली आहे. तसेच योग्य भावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यासाठी कांदा खरेदी केंद्र सुरू करावीत, अशी मागणी केली आहे.
केंद्र सरकारने देशातील कांद्याची गरज पाहता कांदा निर्यातबंदी केली. यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. दुसरीकडे कांदा उत्पादकांनी कांदा लिलाव बंद पाडत सरकरवर दबाव वाढवला आहे. यावर केंद्र सरकारने कांदा खरेदी बंद केल्यास व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिला आहे. कांदा लिलाव आणि खरेदी सुरू झाल्याचे चित्र असले तरी एकूणच कांदा निर्यातबंदीवर राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
एकूणच या विषयावर केंद्र सरकारवर नाराजी वाढली आहे. राज्य सरकारला यावर उत्तर देताना नाकीनऊ येत आहे. आता राज्यात महायुती सरकार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मंगळवारी दिल्लीत संसद भवन परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर गळ्यात कांद्याची माळ घालून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सरकारने कांदा निर्यातबंदी उठवावी अथवा लाल कांद्याची खरेदी केंद्र नगर जिल्ह्यात सुरू करावीत, अशी मागणी केली.
