पारनेर(DSNews24/संतोष कोरडे) तालुक्यातील सांगवी सुर्या येथील गारपीटग्रस्तांचे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . गारपीट ग्रस्तांच्या मागण्या विधानसभेच्या चालु अधिवेशनात मांडण्याची प्रमुख मागणी मान्य झाल्यामुळे हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
गारपीट ग्रस्तांना तातडीची मदत मिळावी, चालु हंगामासाठी विविध बँकांकडून घेतलेले पीक कर्ज शासणाने भरावे , चारा डेपो अशा प्रमुख मागण्या विधिमंडळाच्या चालु अधिवेशनात मांडुन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांगवी सुर्या येथे साखळी उपोषण आंदोलन चालु करण्यात आले होते . तीन दिवसांनंतर जवळे , पानोलीत रस्ता रोको करण्यात आला. गारपीठ ग्रस्तांच्या मागण्यांचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांना अधिवेशनापुर्वी निवेदन देण्यात आले होते.
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आमदार लंके यांनी आंदोलकांची हि मागणी लक्षवेधी द्वारे सभागृहात मांडली, त्यावर मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री शुक्रवारी राज्यातील सर्व गारपीठ ग्रस्तांसाठी विषेश पॅकेजची घोषणा करणार आहेत. त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारच्या मदतीच्या घोषणेची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे .
पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी गारपीट ग्रस्तांची व्यथा लक्षवेधी द्वारे सभागृहात मांडल्याबद्दल त्यांचे आंदोलन समितीकडून आभार व्यक्त करण्यात आले .
