लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार संजय निरुपम आग्रही आहेत.
मात्र उद्धव ठाकरे यांचा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास ठाम नकार दिला आहे. नागपूरमधल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली होती, यावेळी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी संजय निरुपम यांनी काँग्रेस हायकमांडकडे हट्ट धरला.
मुंबईत मातोश्रीवर झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघ लढण्याबाबत ठाम निर्धार व्यक्त केला. काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ संजय निरुपम यांना सोडण्याची गळ ठाकरेंना घातली, पण उद्धव ठाकरे यांनी हा मतदारसंघ सोडण्यास स्पष्ट नकार दिला.
ठाकरे 23 जागांवर ठाम
शिवसेना ठाकरे गटाने लोकसभेच्या 23 जागांसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. परिणामी राहिलेल्या 25 जागांध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांचं समाधान होईल का? वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतील? असे प्रश्न निर्माण झालेत.
काही जागांची अदलाबदल करण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाने दाखवली असली तरी 23 जागांवर तडजोड होणार नसल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय. शिवसेनेनं त्यांची ताकद असलेल्या अमरावतीची जागा सोडून अकोल्याची जागा वंचितला देण्याची तयारी दर्शवली आहे.
मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य, ठाणे, कल्याण, पालघर, मावळ, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक, शिर्डी, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, कोल्हापूर, हातकणंगले, अकोला, रामटेक, बुलढाणा आणि यवतमाळ वाशिमच्या जागांवर शिवसेना ठाकरे गटानं दावा केलाय. त्यामुळे काँग्रेसमधून विरोधाचे सूर उमटले.
