छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) हँडग्लोज (Hand Gloves) बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कामगार झोपेत असताना कंपनीला आग लागली.
वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला.
वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्राईज सी 216 या हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुमारे 20 ते 25 कामगार काम करतात. 10 कामगार कामगार कंपनीमध्ये राहतात. सगळे झोपेत असताना अचानक आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचं दिसलं. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरु झाली.
कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने आतमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडणं शक्य नव्हतं, पण काही कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या साहाय्याने सुखरुप बाहेर पडण्यात यश मिळवलं. भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन मिर्झापूर या सहा कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
आगीतून बचावलेल्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ”कंपनीतील काम बंद झालं आणि रात्री 12 वाजेच्या आसपास सर्व कामगार झोपी गेले. आम्ही सर्वजण अंगावर चादर घेऊन झोपलो होतो. त्यानंतर मध्यरात्री गरम वाफ अंगावर येऊ लागली, त्यामुळे आम्ही जागे झालो.
आजूबाजूला पाहतो, तर आग लागली होती. त्यानंतर कामगारांनी एकमेकांना उठवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दरवाजाच्या बाजूने आग लागल्यामुळे कामगारांनी वरती चढून पत्र्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. चार जण सुखरुप बाहेर पडले.”
