महाराष्ट्र गारठला

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी केल्याने राज्याच्या किमान तापमानात घट झाली आहे. किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली घसरल्याने मध्य महाराष्ट्र गारठला आहे.

धुळे येथील कृषी महाविद्यालयात यंदाच्या हंगामातील नीचांकी ४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तर भारतात थंडीमध्ये चढ-उतार होत आहेत. बुधवारी (ता. २४) हरियानातील आंबाला यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब किमान तापमान ३ ते ६ अंशांदरम्यान तर, हरियाना, उत्तर प्रदेशात ७ ते १० अंशांच्या दरम्यान आहे. उत्तर भारतात धुके, थंडीची लाट, थंड दिवस अनुभवायला मिळण्याचा अंदाज कायम आहे.

उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढली असून, मध्य महाराष्ट्र गारठला आहे. धुळे, निफाड, नाशिक, नगर, पुणे, जळगाव येथे तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे यांच्या हंगामातील नीचांकी ४.७ अंश तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ५.६ अंश तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते १७ अंशांच्या दरम्यान आहे.

विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आज (ता. २५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

Leave a Comment