निलंबनाची, शिस्तभंगाची व दप्तर दिरंगाई करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले असतांना अद्याप कारवाई झाली नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर 20 फेब्रुवारी रोजी उपोषणास बसणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार राम शिंदे यांनी दिला आहे.
त्या संबंधीचे निवेदन शिंदे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना दिले आहे. दरम्यान भाजपचे आमदार आता उपोषणाचा इशारा देऊ लागल्यामुळे भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असल्याचे बोलले जात आहे.
दिलेल्या निवेदनामध्ये म्हणले आहे की, सिना डॅम निमगांव गांगर्डा, ता.कर्जत, जि.नगर येथील येणाऱ्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याबाबत वेळोवेळी मागणी करून देखील किरण देशमुख, कार्यकारी अभियंता कुकडी विभाग, क्र.२, ता.श्रीगोंदा यांनी दिशाभूल करुन खोटी उत्तरं दिली व पाणी शिल्लक असताना देखील शेतकऱ्यांना वेठीस धरून आवर्तन न सोडता जनतेच्या मनात शासनाविरोधात संताप निर्माण होईल व शेतकऱ्यांचे कधीही न भरुन निघणारे नुकसान केले तसेच नियमात नसताना देखील बेकायदेशीररित्या परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव पाठवून वेळकाढूपणा केला. त्यामुळे मी सदरचा प्रश्न उपस्थित केल्याने पालकमंत्री यांनी 12 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय टंचाई आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यावर निलंबन व शिस्तभंगविषयक कारवाई करण्यावावत निर्देश दिले.
निमगांव गांगर्डा येथील ग्रामपंचायतीने तलाठी कार्यालयाची इमारत बांधकामासाठी आपल्या कार्यालयाकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत 2 वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने पालकमंत्री महोदयांनी सदर बाब ही गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून आलं.
त्यामुळे संबंधितांवर दप्तर दिरंगाई झाली असल्याचे स्पष्ट होत असून कारवाई करण्यात यावी यावर जिल्हाधिकारी यांना तात्काळ कारवाई करतो असे उत्तर दिले. त्यामुळे किरण देशमुख यांच्यावर तत्काळ सेवा निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच निमगांव गांगर्डा येथील तलाठी कार्यालय ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने व दप्तर दिरंगाई झाली असल्याने संबंधितांवर अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने मी 20 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या दालनाबाहेर सकाळी 11 वाजल्यापासून बेमुदत उपोषणास वसणार आहे असे दिलेल्या निवेदनामध्ये म्हणले आहे.
