नगर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीगोंद्याच्या नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेसचे(congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रशासन व संघटन विभागाचे सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी राजेंद्र नागवडे यांची अहमदनगर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. दरम्यान, ग्रामीण महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद अनुराधा नागवडे यांच्याकडे असल्याने एका अर्थाने ग्रामीण जिल्हा काँग्रेसवर नागवडे परिवाराचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या काळात ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी राजीनामा दिला होता. त्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केली होती व त्यांना जाहीर पाठिंबा साळुंकेंनी दिला होता. त्यावेळी प्रदेश काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती व तांबेंना दिलेल्या पाठिंब्याचा खुलासा मागवला होता.
तो त्यांनी वेळेत दिला नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही केली होती, पण ही कारवाई होण्या आधीच साळुंकेंनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर आता ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र नागवडे यांची नियुक्ती झाली आहे. ते ज्येष्ठ नेते व आ. बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
