लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी Tv9 चा सर्वात मोठा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत दोन नंबरचा पक्ष ठरणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार, शिंदे गटाला केवळ 3 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खातं देखील उघडणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी सर्वात जास्त आव्हानात्मक असणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठिमागे मोठी सहानुभूतीची लाट असण्याची शक्यता आहे. या सहानुभूतीच्या लाटेमुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी 10 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
तर महाविकास आघाडीतील इतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला एकूण 20 जागांवर महाराष्ट्रात विजय मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला सर्वाधिक 25 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
