महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपकडून आज पुण्यात महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. अशातच आता काँग्रेसच्या गोटातूनही एक महत्त्वपूर्ण बातमी आली असून पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात राज्यात ७५ जागांवर विजयाची चिन्हे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
काँग्रेसने महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांचा सर्व्हे केला असून आगामी निवडणुकीत काँग्रेसला ७५ जागांवर यश मिळू शकतं, असा अंदाज या सर्व्हेतून समोर आल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला असून आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास पक्षाकडून मुख्यमंत्रिपदावरही दावा केला जाण्याची शक्यता आहे. तशी तयारीही काँग्रेसने सुरू केल्याची माहिती आहे. याबाबत ‘साम टीव्ही’ने वृत्त दिलं आहे.
