राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तर गाठीभेटींनाही वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी यांनी भारतीय जनता पक्षाच्या दोन मंत्र्यांची भेट घेतली आहे.
निलेश लंके यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली, त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चा सुरु झाली आहे.
निलेश लंके यांचे लोकसभेतील पहिलेच भाषण गाजले. त्यांच्या भाषणात लोकसभाध्यक्षांनी हस्तक्षेप केला तेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना बोलू द्या म्हणत अध्यक्षांना विनंती केली होती. त्यांच्या भाषणाची चर्चा विरते ना विरते तोच निलेश लंके यांनी आता दिल्लीत भाजपच्या दोन मंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.
अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी पुणे – अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर रेल्वे वाहतूक लवकरात लवकर सुरु करावी, अशी मागणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली. पुणे – नगर रेल्वे वाहतूक सुरु झाल्यास दोन्ही शहरांमधील व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. पुणे – नगर रेल्वे वाहतूकीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मार्गावरुन सेमी हाय स्पिड रेल्वे सुरु केली जाईल असे, माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले होते. मात्र या मार्गावर अजून काम सुरु झालेले नाही.
पुणे ते संभाजीनगर या मार्गावर शिर्डी, शनि शिंगणापूर, यासोबतच आणखीही महत्त्वाची देवस्थाने आहेत. त्यासोबतच एमआयडीसी देखील आहेत. त्यामुळे या मार्गावर रेल्वे सुरु झाली तर प्रवाशांसोबतच औद्योगिकरणालाही चालना मिळेल. गाव खेड्यातून शहरांकडे जाणारे लोंढे थांबतील, असे या भेटीनंतर निलेश लंके म्हणाले.
माजी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता निलेश लंके म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून हा मार्ग रखडलेला आहे. माझ्या आधीच्या लोकप्रतिनिधींनी या मार्गासाठी पाठपुरावा का केला नाही, हा माझा प्रश्न आहे. आता मी फक्त मागणी करणार नाही तर प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझी धडपड सुरु आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे पुणे – संभाजीनगर रेल्वे मार्गासाठी सकारात्मक आहेत. मी त्यांना या मार्गाची सविस्तर माहिती दिली. हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल यासाठी आपण प्रयत्न करु असे ते म्हणाल्याचे खासदार निलेश लंके म्हणाले.
पुणे ते संभाजीनगर रस्ते मार्ग सहा पदरी करणार असल्याची घोषणा रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली होती. आता त्यांची या खात्याच्या मंत्रीपदाची तिसरी टर्म आहे. शिर्डी – अहमदनगर रस्त्यासाठी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आंदोलन सुरु आहे. हा मार्ग कित्येक वर्षांपासून बंद आहे. या मार्गाचे काम करत असलेल्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करुन काम लवकर सुरु करु असे गडकरींनी सांगितल्याचे निलेश लंके म्हणाले.
