पुणे – नगर महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, शिंदोडीचा एक जण ठार

पुणे-नगर महामार्गावर फलके मळ्याजवळ दोन मोटार सायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जन गंभीर जखमी झाला आहे.

संदीप नामदेव गाडीलकर (वय-35, रा. शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दत्तात्रय धुमाळ असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

ही घटना पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव येथील फलके मळा चौकात घडली आहे. याबाबत विशाल बाळू गाडीलकर (वय-२४ वर्ष, व्यवसाय शेती, रा. शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी अज्ञात चालक विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव येथील फलके मळा चौकात हा अपघात झाला आहे. अज्ञात चालक हा पुणे ते नगर जाणारे रस्त्यावर रस्ता ओलांडून कर्डलवाडी कडे जात होता. त्यावेळी रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन करून कोणताही इशारा न देता, तसेच महामार्गावरील वाहनांना प्राधान्य न देता अचानक वळल्याने पुण्याच्या दिशेने येणारे संदीप नामदेव गाडीलकर आणि दत्तात्रय धुमाळ यांची अज्ञात चालकाच्या दुचाकीला जोरदार धडकली.

या अपघातात संदीप गाडीलकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक दत्तात्रय धुमाळ यांच्या डोक्याला व ईतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रांजणगाव गणपती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक थोरात करीत आहेत.

Leave a Comment