आर पी आय (RPI) आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले हे त्यांच्या वाक् शैली मुळे नेहमी चर्चेत राहतात. त्यांची विधाने ही राजकीय तणावाला हलकी करणारे देखील असतात. राजकारणात ते कधी कोणाशी कटूतेने वागत नाहीत, त्यामुळेचे ते विरोधकांना सुद्धा कधी कधी मोलाचा सल्ला देऊन टाकतात.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना असाच एक सल्ला त्यांनी आज ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खा. शरद पवार यांना दिला आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध असून पंतप्रधान मोदींनी पवारांचे अनेकवेळा कौतुक केले आहे.
तसेच शरद पवारांनी (Sharad Pawar) कितीही विरोधी पक्षाला एकत्र करून आघाडीच्या बैठका घेतल्या, तरी २०२४ मध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येणार आहे. नागालँड प्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत यावे असे निमंत्रण आणि मोलाचा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale) यांनी शरद पवार यांना दिला आहे.
रामदास आठवले हे सांगली येथे दौऱ्यावर असताना, पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
