पारनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम त्वरित सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, संघटक बाळशिराम पायमोडे यांनी २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणावर ठाम असल्याचा निर्णयच उपोषणकर्त्यांनी घेतलाय.
दरम्यान उपोषणाला पाच दिवस उलटून गेले तरीही अद्यापही प्रशासनाला जाग आलेली नाही. तसेच प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला देखील नाही. त्यामुळे उपोषण लांबणार असल्याची चिन्हे दिसत आहे. मात्र उपोषणकर्त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने प्रकृती काहीसी खालावली आहे. प्रशासनाने अद्यापही उपोषणाकडे लक्ष न दिल्याने आता शेतकरी संतप्त होताना दिसत आहे. तसेच रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान उपोषणाच्या सहाव्या दिवशी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी सुजित झावरे पाटील यांनी उपोषणकर्त्यांसोबत मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच तालुक्याच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्नाची मागणी रास्त असून याबाबत लवकरच ठोस भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.
तसेच उपोषणकर्त्यांची मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर घातली असून याबाबत तसं बोलण देखील झाल असल्याचे ते म्हणाले. उपोषणस्थळावरूनच झावरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनद्वारे चर्चा केली.
येत्या दोन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी आणून या मागण्यांसंदर्भात समक्ष चर्चा करू, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत विषय मांडणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
पारनेकरांच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा असून एकजूट होण्याची गरज आहे. तसेच जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडू नका. तसेच संबंधित विषय मार्गी लागले नाही तर लवकरच पुढची वेगळी भूमिका घेऊ असे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
