राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यांची पत्नी आणि लेक पूर्वा यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच दिलीप वळसे पाटील देखील पवारांची पुण्यात भेट घेणार असल्याचे बोलले गेले.
लोकसभेत अजित पवार गटाचे शिरूरमध्ये सक्रीयपणे काम न करून शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा दरवाजा दिलीप वळसे पाटील यांनी उघडा ठेवला होता. विधानसभेच्या तोंडावर वळसे पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करून अजित पवार यांना दणका देतील, अशी चर्चा होती.
मात्र यात कुठलेही तथ्य नसून मी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतच आहे. सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत मतदारसंघातच उपस्थित राहून लोकांच्या गाठीभेटी घेतोय. विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावतोय, असे वळसे पाटील यांनी सांगितले. त्याचवेळी माझी मुलगी आणि पत्नी यांनीही शरद पवार साहेबांची कुठेही भेट घेतलेली नाही, असे सांगत भेटीच्या चर्चा फेटाळून लावल्या. मी अजित पवार यांच्या पक्षातच राहीन, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
