महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिली पक्षाला सोडचिठ्ठी

भाजपला नंदूरबारमध्ये एक मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते पद्माकर वळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

धनगर आरक्षणाबाबत सरकारची भूमिका न पटल्याने वळवी यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच वळवी यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीकाही केली होती. तर आता त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आपले राजीनामा पत्र पाठवले आहे.

वळवी म्हणाले की, ‘मी भाजपची साथ सोडत आहे. राज्यात आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न सुरु आहे. त्यावरून मी माझी सामाजिक आणि आर्थिक भूमिका आदिवासींच्या वतीने मांडली होती. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. सरकारने याबाबत अद्याप कोणतही भूमिका घेतलेली नाही. मी आदिवासी नेता असून त्यांच्या प्रश्नांवर काम केलं आहे’.

तसेच ‘मी अनेकदा आदिवासींच्या प्रश्नांसाठी सरकारशी चर्चा करत आलो आहे. धनगर समाज प्रस्थापित आहे. तो समाज आदिवासींच्या आरक्षणात शिरु इच्छित आहे. सरकारने त्यांना आश्वासन दिलं आहे. त्याचा निषेध म्हणून मी माझ्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहे’, असे वळवी यांनी सांगितले आहे.

राज्यातील आदिवासींचा आक्रमक चेहरा म्हणून पद्माकरक वळवींना ओळखलं जातं. लोकसभेपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजप(BJP)मध्ये प्रवेश केला होता. तर विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे आता वळवी कोणत्या पक्षात प्रवेश करतात की घरवापसी करत काँग्रेसमध्ये जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment