बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारातमी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत नवा गौप्यस्फोट केला. बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात निवडणूक झाली होती.

या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. या निकलावर आज पुन्हा एकदा अजित पवारांनी भाष्य केलं. “मागं जाताना मी फार जोरात जायचो. लोकसभेचा निकाल थोडा वेगळा लागला. बारामतीकरांनी ठरवलं होतं खासदारकीला ताईंना निवडून द्यायचं. त्यामुळे बऱ्याच घरातले काही काही तर म्हणायचे, आमचे चार मते आहेत. दोन दादांना दोन साहेबांना. काहींनी तर चारहीचे चारही मते साहेबांना असंही केलं. पण आता पुढं कुणाला संधी द्यायची ते तुम्ही बघा. परंतु हे झालं आहे. ते नाकारू शकत नाही. अल्पसंख्याक समाज माझ्यापासून दूर गेलेला पाह्यला मिळाला”, असं अजित पवार म्हणाले.

“महाराष्ट्र शासनाने बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत एप्रिल, मे जूनचं चालू वीज बिलाचा पहिल्या हप्त्याचा भरणा सरकारने केलं आहे. वीज बिलमाफ केलं म्हणजे १४ हजार ९०० कोटी रुपये आम्ही महावितरणला भरले. त्यामुळे वीज बिल माफ केलं. या योजनेनुसार तुम्हाला झिरो बिल दिलं जाईल. तुम्ही पुन्हा महायुतीचं सरकार आणा. काही लोकांना वाटतं पुढे काय? तर ते तुमच्या हाती आहे. जिथे घड्याळ असेल तिथे घड्याळाला, जिथे कमळ असेल तिथे कमळाला आणि जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाणाला बटन दाबलं तर तुम्हाला पुढेही झिरो बिल दिलं जाईल”, असं अजित पवारांनी सांगितलं.

Leave a Comment