उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भाजपकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानंतरही ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले असा खळबळजनक दावा शिंदे गटाच्या नेत्याकडून करण्यात आला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गट संतापण्याची शक्यता आहे.
भाजप- शिवसेनेनं 2019 ची निवडणूक युतीमध्ये लढवली होती. पण निकालानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात सर्वाधिक आमदार निवडून येऊनही सत्तेबाहेर ठेवले होते.तसेच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली होती.
पण आता सिडकोचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा दावा करण्यात आल्याने नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाविषयी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, 2019 च्या निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेनेला बहुमत मिळाले होते. त्यावेळी सर्व काही ठरले होते.
पहिली अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद देण्याचंही भाजपकडून मान्य करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी चर्चेसाठी कुणीतरी माणूस पाठवण्याची विनंती करण्यात आली होती. पण ठाकरेंनी चर्चेसाठी कुणालाही पाठवलं नाही असं शिरसाट यांनी सांगितलं आहे.
