नगरमधील भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या भेटीला गेले पण घडल भलतच… 

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होत आहे. शरद पवारांच्या निवासस्थानीही नेते आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. नगरचे भाजपचे नेते असलेले राजेंद्र पिपाडा हेदेखील शरद पवारांच्या भेटीला आले होते, पण गर्दीमुळे ते भेट न घेताच माघारी परतले.

राजेंद्र पिपाडा यांनी याआधी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर बोचरी टीका केली होती. विखे पाटील महादेवाच्या पिंडीवर बसलेले विंचू आहेत, या विंचवाला मारायचं असेल तर चप्पल महादेवाला लागते, अशी अवस्था भाजपच्या नेत्यांची झाली आहे, असं टीकास्त्र राजेंद्र पिपाडा यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर डागलं होतं.

शिर्डी विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा भाजपचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेत व्यक्त केली होती, त्यानंतर विखे पाटलांच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप पिपाडा यांनी केला. विखे पाटील हे भाजपच्या नेत्यांनाच त्रास देत असुन ते पक्षात आल्यानंतर पक्षाची अधोगती झाल्याचंही पिपाडा म्हणाले होते.

मागच्या विधानसभा निवडणुकीत विखे पाटील यांच्यामुळे जिल्हयात भाजपच्या पाच आमदारांचा पराभव झाला तर या लोकसभा निवडणुकीत शिर्डी आणि नगर लोकसभा गमवावी लागल्याचा गंभीर आरोप पिपाडा यांनी केला होता.

2009 साली राजेंद्र पिपाडा यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढली होती. अत्यंत चुरशीच्या या लढतीमध्ये पिपाडा यांचा अवघ्या 13 हजार मतांनी पराभव झाला होता. यानंतर 2019 साली विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. पिपाडा आणि विखे पाटील या कट्टर विरोधकांचं मनोमिलन घडवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा पिपाडा यांनी विखे पाटील पिता-पूत्रांविरोधात शड्डू ठोकला आहे.

Leave a Comment