नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात बाप आणि लेकराच्या नात्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दवाखान्यात जास्त पैसे खर्च झाले म्हणून बापाने मुलाला छताला उलटे टांगून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदवडच्या धोतरखेडे गावात हा संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणीत निर्दयी बापावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगेश बेंडकुळे असं या निर्दयी पित्याचे नाव आहे.
मंगेश बेंडकुळे याचा ५ वर्षांचा मुलगा आजारी पडला होता. त्याला दवाखान्यात घेऊन आला होता. पण मुलगा आजारी पडल्यानंतर त्याच्यावर दवाखान्यात औषधोपचारासाठी जास्त पैसे खर्च झाले. पोराच्या उपचारासाठी जास्त पैसे खर्च झाल्यामुळे मंगेश बेंडकुळे आणि त्याच्या बायकोमध्ये वाद झाला होता.
त्यानंतर मंगेशने रागाच्या भरात ५ वर्षाच्या मुलाला छताला उलटे टांगून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुलाला मारहाण करीत असताना त्याला वाचविण्यासाठी आई पुढे आली असता तीला देखील या सनकी व्यक्तीने मारहाण केल्याचे समोर आलं आहे. या प्रकारणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी मंगेश बेंडकुळे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
‘पती आणि पत्नीत वाद झाल्यामुळे घरगुती भांडणातून हा सर्व प्रकार घडला असून मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
