शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आपल्याला ऑफर आल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या बड्या नेत्याकडून पक्षप्रवेशाबाबत फोन आला होता, असं मिटकरी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकपद, सत्ता आल्यावर राज्यमंत्रिपद आणि विधान परिषद आमदारकी अशी ऑफर शरद पवार गटाने दिल्याचा अमोल मिटकरी यांचा दावा आहे. मात्र अजित पवार यांच्यासोबत निष्ठावान असून आपण मेल्यानंतर आपल्या सात पिढ्याही अजित दादांसोबत राहतील, असं मिटकरींचं म्हणणं आहे. अनेक पक्ष फोन करतात, सौजन्याचं नातं असल्याने सगळं काही बोलता येत नाही, पण हे सगळं काही आहे ते मी माझ्या नेत्यांना कळवत असतो.
मंत्रिपदं असतील किंवा स्टार प्रचारकाच्या ऑफर असतील किंवा जे काही असेल, ते अजितदादांपुढे आम्हाला शून्य आहे. आम्ही अजितदादांना पाहूनच पक्षात आलो. आमच्या पुढच्याही सात पिढ्या, म्हणजे मी मेल्यानंतर सुद्धा माझ्या सात पिढ्या या अजित दादांच्या उपकारातून कधीच मुक्त होऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली
