संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेलं आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख सामना पाहायला मिळणार आहे. तसेच इतरही पक्ष निवडणुकीसाठी सज्ज असल्याने जोरदार बैठका सुरू आहे.
दरम्यान माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात माजी खासदार डॉ. सुजय विखेंनी रणशिंग फुंकले आहे. संगमनेर विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे थोरातांच्या विरोधात कोण उभे राहणार हे अजून स्पष्ट झाले नाही. परंतु डॉ. सुजय विखे पाटील संगमनेर विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहे. तसेच महायुतीच्या जागा वाटपामध्ये संगमनेरची जागा ही भाजपला मिळावी यासाठी ते स्वतः आग्रही असून त्यांनी पक्षाकडे उमेदवारीही मागितली आहे.
त्यामुळे अद्यापही जागावाटप झाले नसले तरी डॉ सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तळेगाव दिघे पाठोपाठ आता साकूर येथे सोमवार दि.२१ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ठिक ६.०० वाजता युवा संकल्प मेळाव्यासह जाहीर सभा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना समितीचे सदस्य रउफ शेख यांनी दिली आहे.
दरम्यान साकूर येथील सभेत डॉ सुजय विखे पाटील नेमकं काय बोलणार? तसेच कोणावर निशाण साधणार याचीच उत्सुकता लागली आहे. तसेच या सभेत डॉ सुजय विखेंच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील माहिती समोर आली. त्यामुळे या सभेकडे साकूर पठार भागासह संगमनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सध्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. तसेच सभेसाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
