संगमनेर(DSNews24/किरण पुरी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील साकूर गटात एक मोठी घडामोडी घडल्याचे बघायला मिळाले. महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने तातडीची महत्वपूर्ण बैठक साकूर जवळील बिरेवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. दरम्यान सोमवारी भाजप नेते माजी खासदार सुजय विखे पाटील यांची जाहीर सभा होणार असून त्यापुर्वीच ठाकरे गटाने बोलाविण्यात आलेल्या बैठकीत शिवसैनिक काय निर्णय घेणार याकडेच संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
बैठकीत काय झाली चर्चा…
राज्यात महाविकास आघाडी बनल्यापासून तालुका व स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला कॉंग्रेसने कधीच महत्त्व दिले नाही. तरी देखील लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरेंच काम देखील शिवसेना म्हणूनच केलं. मात्र कॉंग्रेसने कधीच आघाडीचा धर्म पाळला नाही. कोणतेही उद्घाटन शुभारंभ असो फ्लेक्स वर साधा उद्धव ठाकरे साहेबांचा फोटो देखील छापला नाही. विकासकामांच्या भुमिपुजनाला देखील कॉंग्रेसचे नेते बोलवत नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना म्हणून सोबत काम करायच का नाही? अशी चर्चा करत यापुढे पठार भागात एकत्रित काम करण्याचा निर्णय यावेळी ठाकरे गटाच्या बैठकीत घेण्यात आला.
तसेच अस्तित्व दाखवल्यानंतरच किंमत कळते. मात्र आज ना घर की ना घाट की अशी परिस्थिती स्थानिक पातळीवर ठाकरे गटाची निर्माण झाली. राज्यात जरी महाविकास आघाडी असली तरी संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच नाही. म्हणून ठाकरे गटाची मोठी फरफट झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून काम करायच का नाही? अशी चर्चा बैठकीत करण्यात आली.
आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत साकूर गटात एक जागा शिवेसेनेलाच मिळालीच पाहिजे. कारण ४० वर्षांत कॉंग्रेसने स्थानिक पातळीवर कोलून दिल. त्यामुळे ठाकरे गटाला कॉंग्रेसचा कधीच फायदा झाला नाही. त्यामुळे सध्याच्या विधानसभा निवडणुकीची योग्य वेळीच भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच संगमनेर विधानसभा निवडणुकीत भाजपकडून सुजय विखे यांना तिकीट मिळाल तर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. तसेच सुजय विखे यांना जरी भाजपकडून तिकीट मिळाल नाही, तरी जो भाजपचा उमेदवार असेल त्यावेळी देखिल त्या बाबत त्यावेळीच भूमिका स्पष्ट करण्याची चर्चा बैठकीत करण्यात आली.
दरम्यान ठाकरे गटाच्या बैठकीतील या चर्चेने कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत मोठी फूटच पडण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या या भूमिकेमुळे साकूर गटात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता यावर कॉंग्रेसचे नेते ठाकरे गटाची कशी समजूत काढणार याचीच उत्सुकता लागली आहे.
या बैठकीसाठी शिवसेना व युवासेनेचे तालुकाप्रमुख, पठार भागातील सर्व गट प्रमुख, शाखा प्रमुख, गण प्रमुख, विभाग प्रमुख, महिला आघाडी, तसेच ठाकरे गटाचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक व पठार भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान सोमवारी साकूर येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या जाहीर सभेत काही कार्यकर्त्ये जाहीर प्रवेश करणार आहे.
