राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेत महायुतीमधील 99 उमेदवारांची नावे घोषित केली. त्यामुळे, या 99 उमेदवारांकडून प्रचाराला व मतदारसंघात जोमाने काम सुरू झालं आहे.
दुसरीकडे अजित पवार यांनीही राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे उमेदवारांच्या रांगा पक्षाच्या नेत्यांकडे लागल्या आहेत. त्यातच, आज महाविकास आघाडीची नावे जाहीर होण्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार एबी फॉर्म घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडून (Sharad pawar) खासदार निलेश लंकेंच्या (Nilesh Lanke) पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राणी लंके ह्या पारनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असतील.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील जे उमेदवार निश्चित झाले आहेत त्यांना एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली आहे. मुंबईतून घाटकोपर पूर्वसाठी राखी जाधव, चिपळूण विधानसभेसाठी प्रशांत यादव, पारनेर विधानसभेसाठी राणी लंके यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मतदारसंघात प्रचारासाठी उमेदवारांना तत्काळ कामाला लागता यावं, यासाठी पक्षाकडून तत्काळ एबी फॉर्म देण्यात येत असल्याची माहिती आहे.
