विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. मात्र भाजप वगळता अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीमधील एकाही घटक पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे.
मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील जागा वाटापाचा तिढा अद्यापही सुटला नसल्याचं पाहायला मिळत आहे. जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये तणावाची स्थिती आहे. त्यामुळे उमेदवाराच्या यादीला देखील विलंब होत आहे. दरम्यान आता घडामोडींना वेग आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जागा वाटपासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली. या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना थोरात यांनी म्हटलं की, आमच्यात कोणताही वाद नाही, एकत्र बसून मार्ग काढू. ठाकरेंच्या मनात काय आहे, पवारांना काय वाटतं हे या बैठकीत समजून घेतलं. उमेदवारांची यादी कधीही येऊ शकते. साडेतीन वाजता महाविकास आघाडीची बैठक आहे, या बैठकीमध्ये चर्चा करू असं थोरात यांनी म्हटलं आहे.
