भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान – हिरालाल पगडाल

संगमनेर : भारतामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क,कर्तव्य व मार्गदर्शक तत्वे याविषयी माहिती दिलेली आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे संविधान असून ते जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे असे प्रतिपादन मा. हिरालाल पगडाल यांनी केले, ते रमेश फिरोदिया महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संविधान दिन या कार्यक्रमात बोलत होते.

संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रमेश फिरोदिया कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राज्यशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला होता. यावेळेस व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक मा. हिरालाल पगडाल, कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ.हेमलता राठोड, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य दिपकजी फिरोदिया, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप, संजय शेलार, वीरभद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब खरात, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर, विद्यार्थी विकासा अधिकारी प्रा. गणेश साळुंखे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संविधान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करून करण्यात आली. हिरालाल पगडाल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारतीय जनतेसाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व सत्ता संपत्ती मिळवण्याचे स्वातंत्र्य या सर्व बाबींचा विचार घटनाकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानामध्ये केलेला आहे. त्यामुळे मूलभूत अधिकार हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे.देशाच्या राज्यघटनेला अंतिम स्वरूप देण्याचे काम मसुदा समितीने केले, त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ.हेमलता राठोड या अध्यक्ष मनोगत म्हणाल्या की, आपल्या देशाचे संविधान हे स्वातंत्र्य, समता,न्याय, बंधुता या तत्त्वावर आधारित आहे. आज देशाने संविधान स्वीकारून 75 वर्ष पूर्ण झाली आहे म्हणून आपण हर घर संविधान हा उपक्रम राबवित आहोत.जगातील लोकशाही असलेल्या देशांमध्ये भारतीय संविधान हे सर्वात मोठे आहे भारतीय संविधानाची मार्गदर्शक तत्वे जनसामान्यांमध्ये रुजवण्यासाठी व विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व समजावे, त्यांनी ते अंगीकारावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप यांनी करून दिला.

संविधान दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात महाविद्यालयातून झाली. महाविद्यालय ते बस स्टँड, चौफुली, ग्रामसचिवालय,मुख्य बाजारपेठ, दत्त मंदिर या मार्गे रॅली काढण्यात आली. संविधान जागृती रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी फलक घेऊन भारत माझी माऊली – संविधान त्याची सावली, सबसे प्यारा संविधान हमारा,स्वातंत्र्य, समता, बंधुता संविधान सांगते एकात्मता, बाबासाहेबांचे योगदान भारताचे संविधान, संविधानाची अफाट शक्ती मुक्त विचार अन अभिव्यक्ती या घोषणा देऊन जनजागृती केली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. जया रकटे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर यांनी मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता पुरी या विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment