राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना समाजसेवेसाठी प्रेरणा देणारा – प्राचार्या डॉ. हेमलता राठोड

पारनेर(DSNews24) राष्ट्रीय अस्मितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे महत्त्वाची असतात. सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक जडणघडणीत महाविद्यालयीन काळात केलेल्या श्रमसंस्कारांचा वाटा मोठा आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वयंसेवकांना समाजसेवेसाठी उत्तम प्रेरणा देणारा आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी शिक्षण घेऊन किंवा स्पर्धा परीक्षा पास होऊन नोकरी म्हणून विचार करू नये तर शिक्षणाचा उपयोग उत्तम नागरिक घडवण्यासाठी करावा ,शिक्षणातून सुसंस्कृत पिढी निर्माण करावी .शिक्षण हे विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासाचे व समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. हेमलता राठोड यांनी केले त्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी येथे बोलत होत्या.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय साकुर यांच्या संयुक्त विद्यमाने युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी या उपक्रमांतर्गत शुक्रवार दि. 10 जानेवारी 2025 ते गुरुवार दि.16 जानेवारी 2025 या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन कामटवाडी ता.पारनेर येथे केले होते. या शिबिराचा समारोप दि. 16 जानेवारी 2025 रोजी झाला.

यावेळेस व्यासपीठावर गावचे प्रथम नागरिक सरपंच व कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय काशिद, जय मल्हार देवस्थानचे सचिव कारभारी आहेर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हेमलता राठोड, उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप,नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जालिंदर आहेर,ग्राम विकास अधिकारी विजय आहेर, दत्तात्रय आहेर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ रोकडे,उपसरपंच मा. जानकू दुधवडे, रंगनाथ गुंजाळ ,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विभाग समन्वयक प्रा.म्हतू खेमनर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळेस ग्रामपंचायत सरपंच व कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय काशिद यांनी आपल्या मनोगतात श्रमसंस्कार शिबिरात स्वयंसेवकांनी केलेल्या श्रमदानाचे कौतुक केले.जीवनात यशस्वी होण्यासाठी कठीण परिश्रम घेतल्याशिवाय पर्याय नाही, त्यात कुठलाही शॉर्टकट मार्ग उपलब्ध नाही. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व समजते व त्याचबरोबर त्यांना मानवी जीवनमूल्य ही समजतात. त्यामुळे अशी शिबिरे होणे काळाची गरज आहे. सर्व स्वयंसेवकांनी गावामध्ये राबवलेली उपक्रम व ग्राम स्वच्छता अभियान हे वाखण्या सारखे आहेत.

प्राचार्य मा.जालिंदर आहेर बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व व्यक्तिमत्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना समाजाप्रती आपली असलेली आपुलकी निर्माण होते .देशाप्रती असलेली आत्मीयता त्यांच्यामध्ये वृद्धिंगत होते .महाविद्यालयीन जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातून श्रमाचे महत्व व समाजाची प्रतिष्ठा स्वयंसेवकांना समजते. माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य ब्रीद वाक्य आहे त्यासाठी स्वयंसेवक सातत्याने तत्पर असणे आवश्यक आहे.

उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप, कारभारी आहेर, मा. दत्तात्रय आहेर, मा. प्रवीण आहेर, ग्रामविकास अधिकारी विजय आहेर,मुख्याध्यापक गोरक्षनाथ रोकडे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. सर्व स्वयंसेवकांनी खूप सुंदर स्वरूपाची कामे या गावात केलेली आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले, यामध्ये ग्रामस्वच्छता, वृक्षलागवड, गावचे सामाजिक – आर्थिक व आरोग्यविषयक सर्वेक्षण ,शिवार फेरी, गटचर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, जलसंधारण, महिला सबलीकरण, शाश्वत व सर्वांगीण विकास , पर्यावरणपूरक पर्यटन,हुंडा बंदी जनजागृती व लोकसंख्या नियंत्रण जनजागृती इत्यादी उपक्रम राबविण्यात आली.

या श्रमसंस्कार शिबिरात तज्ञ व्याख्यात्यांची विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने झाली.

डॉ. जिजाबा घुले यांचे संस्काराचे महत्त्व, प्रा.बाबासाहेब खरात यांचे मन करा रे प्रसन्न, प्राचार्य डॉ.हेमलता राठोड यांचे राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान, डॉ.दत्तात्रय कांबळे यांचे योगा व प्राणायम मार्गदर्शन व प्रात्यक्षिक प्रा.मंगेश वाघमारे यांचे आजची तरुणाई, प्रा. पोपट खेमनर यांचे ईस्ट इंडिया कंपनीचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, प्रा. निलेश परबत यांचे प्रेम शब्दांच्या पलीकडे ,प्रा. शिवनाथ तक्ते यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासातील स्थान, मा. कारभारी आहेर यांचे शिक्षण आणि अध्यात्म ,ग्राम विकास अधिकारी विजय आहेर यांचे स्पर्धात्मक परीक्षेची तयारी अशा विविध विषयांवर व्याख्याने झाली. स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक करून स्वयंसेवकांना अनमोल असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक सौरभ खेमनर व गायत्री गाडेकर यांचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सन्मान करण्यात आला. स्वयंसेवक सौरभ खेमनर, रोहित आव्हाड, गायत्री गाडेकर, अर्पिता पुरी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सर्व स्वयंसेवकांनी उत्तम असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून ग्रामस्थांची मने जिंकली. गावामध्ये हुंडाबंदी प्रतिबंधक जनजागृती फेरीचे आयोजन करून स्वयंसेवकांनी घोषणा देऊन प्रबोधन केले. ग्रामविकास अधिकारी विजय आहेर यांनी सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका यांना प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास,जनतेशी नाळ जोडताना व मेंदूची मशागत ही पुस्तके भेट देऊन सन्मानित केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर,सहकार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्र लेंडे,प्रा. योगेश साळुंके, प्रा. पोपट खेमनर प्रा.शबाना शेख,प्रा. कल्पना शेळके , प्रा.जया राशीनकर, प्रा.वृषाली डोके,प्रा.प्रियंका हाके,प्रा. स्वाती ढोकरे, प्रा.सिरीन शेख, प्रा. आरजू शेख,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश साळुंके यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून वेगवेगळे उपक्रम राबवून घेतले.

या श्रमसंस्कार शिबिराला मा.कारभारी आहेर, ग्रामविकास अधिकारी विजय आहेर, व श्री. गुंजाळ सर, श्री.शिंदे सर, सरपंच संजय काशीद, प्राचार्य.जालिंदर, आहेर यांचे अनमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्र लेंडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका कु. अर्पिता पुरी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर यांनी मानले. यावेळेस सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment