मोठी बातमी! काँग्रेस खासदाराला अटक, पराक्रम वाचून बसेल धक्का 

सीतापूर: एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी विद्यमान काँग्रेस खासदाराला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी खासदाराने लग्नाचं आमिष दाखवून पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला आहे.

सलग पाच वर्षे हा धक्कादायक प्रकार सुरू होता. याप्रकरणी पीडित महिलेनं काँग्रेसच्या खासदारावर गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित खासदार फरार झाले होते. आता अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

राकेश राठोड असं अटक झालेल्या काँग्रेस खासदाराचं नाव असून ते उत्तर प्रदेशातील सीतापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झालेल्या राकेश राठोड यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुरुवारी त्यांना अटक केली.

अटकेच्या एक दिवस आधी न्यायालयाने काँग्रेस खासदार राकेश राठोड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. सुनावणीनंतर न्यायमूर्ती राजेश कुमार सिंह यांच्या एकल खंडपीठाने राठोड यांना दोन आठवड्यांत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वी, न्यायालयाने सोमवारी राठोड यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट (एनबीडब्ल्यू) जारी केले होते.

 

दोन आठवड्यांपूर्वी गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी पीडित महिलेने राकेश राठोड यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. पीडितेने पोलिसांना कॉल रेकॉर्डिंगही दिले आहे. ज्यात पीडितेला सतत धमक्या दिल्या जात होत्या. या प्रकरणी कोतवाली नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एसपी चक्रेश मिश्रा यांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यापासून खासदार राठोड फरार होते.

पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर लग्न करण्याचं आमिष

महिलेने आरोप केला आहे की, ती 2018 मध्ये राकेश राठोड यांना पहिल्यांदा भेटली. त्यावेळी राठोड आमदार होते. दरम्यान, राठोड यांनी पीडित महिलेला सीतापूर येथील तैलिक महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष बनवले. 2020 मध्ये ती राकेश राठोड यांच्या घरी गेली होती. यावेळी राठोड यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. तेव्हापासून खासदार राठोड पीडितेला सतत ब्लॅकमेल करत होते, असा आरोपही पीडितेनं केला आहे. राकेश राठोड यांनी पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तुझ्याशी लग्न करतो, असं आमिष पीडितेला दाखवलं होतं. यातून राठोड यांनी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले, असंही पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Leave a Comment