संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्याच्या पठार भागातील साकूरचे ग्रामदैवत बनाची देवीची (मुक्ताई) यात्रा परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षांपासून उत्साहात साजरी होत असते. यंदाही बनाच्या देवीची यात्रा ९ व १० एप्रिल रोजी होणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी केली असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष अनिल नानापाटील खेमनर यांनी दिली.
हरिश्चंद्र येथून उगम पावणाऱ्या मुळा नदी किनारी मुक्ताई देवीचे मंदिर उभारले आहे. तसेच निसर्गरम्य वातावरणाने परिसर नटून थटून गेलेला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून जाते. तसेच दरवर्षी उन्हाळ्यात बनाच्या देवीची यात्रा भरत असल्याने या ठिकाणी लाखो भाविक येत असतात. गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे यात्रा बंद ठेवण्यात आली होती. परंतु गेल्या वर्षीपासून बनाच्या देवीची यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
यंदाही बनाच्या देवीची यात्रेला ९ एप्रिल रोजी सुरूवात होणार असून सकाळी ९ वाजता देवीचे चोळी पातळ व मुखवटा मिरवणूक तर सायंकाळी ४ वाजता साकूर ते बन अशी भव्य काठी मिरवणूक निघणार आहे. तसेच रात्री रसिकांच्या मनोरंजनासाठी मनिषा सिद्धटेककर सह रेश्मा नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. यावेळी देवीच्या मंदिरासमोर शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात येणार आहे.
तसेच १० एप्रिल रोजी मुख्य यात्रा उत्सव संपन्न होणार असून दुपारी ३ वाजता भव्य कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने केले आहे. यावेळी विविध जिल्ह्यांतील नामांकित पैलवान आखाड्यात उतरणार आहे.
यात्रेकरूंसाठी यात्रेच्या दिवशी विविध सुविधा यात्रा कमिटीच्या वतीने उपलब्ध केल्या आहेत. तसेच यात्रेच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी घारगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात असणार आहे.
तसेच बनाची देवीच्या यात्रा उत्सावात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष मन्सूर पटेल, सचिव भास्कर खेमनर, सदस्य अकबर चौगुले, नामदेव खेमनर, विठोबा खेमनर, शशिकांत केदारी, सचिन सोनवणे यांनी केले आहे.
