HSC Exam 2025 : बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू, कॉपी करताना आढळल्यास थेट…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे.

यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उद्यापासून बारावीची परीक्षा सुरू होणार असल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

शरद गोसावी म्हणाले की, बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत असून 10 दिवस आधी परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तसेच 15 मेपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असेल. या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले आणि 6 लाख 94 हजार 352 मुली आहेत. तर 37 ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत. या पैकी 7 लाख 68 हजार 967 विद्यार्थी विज्ञान शाखेची परीक्षा देणार आहेत. 3 लाख 80 हजार 410 विद्यार्थी कला शाखेची तर 3 लाख 19 हजार 439 विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देणार आहेत, अशी माहिती गोसावी यांनी दिली आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील एकुण ८१८ परीक्षा केंद्रावर यापुर्वी कॉपीच्या गैरमार्गाची प्रकरणे आढलेली आहेत. त्यामुळे आता या परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीची नियुक्ती करताना अदलाबदल करण्यात येणार आहे. करोना काळातील सन २०२१ व सन २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षांच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०१८, २०१९, २०२०, २०२३ व २०२४ या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत.

अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंकित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणा-या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचा-यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचा-यांमधून करण्यात येणार आहे. पुणे – १२५, नागपूर – १०४, छत्रपती संभाजीनगर – २०५, मुंबई – ५७ , कोल्हापूर – ३९, अमरावती – १२४, नाशिक – ८८, लातूर – ७३, कोकण – ३ याप्रमाणे परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्यात येणार आहे, अशी महिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

राज्य मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प व तत्सम परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची परीक्षा लेखी परीक्षेनंतर १२ मार्च, १५ मार्च, १७ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी या परीक्षांचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरून घेण्यात येणार आहेत.

मुंबईतील दोन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी विशेष सुविधा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यातील एका विद्यार्थ्याला दृष्टीदोषामुळे वाचण्यास अडचण येत असल्याने त्याला हेडटॉर्च वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याला उष्णतेचा त्रास होत असल्याने त्याची एसीची सोय असलेल्या परीक्षा केंद्रात व्यवस्था करण्यात येणार आहे.

Leave a Comment