साकूर – शिंदोडीपर्यंत पिंपळगाव खांडचे पाणी का आले नाही, रऊफ शेख यांनी सांगितले कारण….

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) पिंपळगाव खांड धरणातुन सोडण्यात आलेले आवर्तन साकूर पठारभागातील शिंदोडी पर्यंत पाणी येईपर्यंत चालु ठेवावे अशी या भागातील जनतेची मागणी होती. परंतु लाभक्षेत्रातील आभाळवाडीपर्यंत पाणी आल्यानंतर आमदार किरण लहामटे यांनी आवर्तन थांबवले व पाणी खाली लाभक्षेत्राबाहेर कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणारच नसल्याची भुमिका घेतली. यावर भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी शेख म्हणाले की, 2009 साली मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपळगाव खांड धरणाला मंजुरी मिळाली. तेव्हा या भागाचे माजी लोकप्रतिनिधी हे ही त्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा या साकूर पठारभागातील गावांचा समावेश या धरणाच्या लाभक्षेत्रात नाही एवढी गंभीर बाब त्यांनी जनतेपासुन लपवुन ठेवली. त्यानंतरही मागील 15 वर्षे सलग हा पठारभाग माजी लोकप्रतिनिधींच्या मतदार संघात असतानाही या भागाचा पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रात समावेश होण्यासाठी स्वयंघोषित जलनायक यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, त्याचेच फळ म्हणून केवळ लाभक्षेत्रात नसल्याने पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याचे आवर्तन साकूर पठारभागाला मिळत नाही व त्यांच्यामुळे हा भाग पाण्यापासुन वंचित राहिला, हे त्यांचे फार मोठे अपयश आहे असा टोला शेख यांनी थोरातांचे नाव न घेता लगावला आहे.

2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत हा साकूर पठारभाग अकोले विधानसभा मतदारसंघातुन वगळुन संगमनेर विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला नसता तर धरणाच्या लाभक्षेत्रातुन ही भाग कदाचित वगळला गेलाच नसता व धरणाची निर्मिती झाल्यापासुन आधी आ.पिचड व आता आ.लहामटे यांनीही या भागाला पाणी देण्यासाठी विरोध केलाच नसता, त्यामुळे धरणाच्या निर्मितीपासुनच जर या भागाचा समावेश लाभक्षेत्रात असता तर आज कुणाचाही विरोध असायचे काहीच कारण नव्हते, पण केवळ या संगमनेर मतदारसंघातील माजी लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे आज आम्हाला हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

मुळा नदीच्या पाण्यावर आमचाही तेवढाच हक्क आहे. कारण याच नदीवर मागे पिंपळगाव खांड धरण बांधुन आमचे हक्काचे पाणी अडवले गेले आहे, जे आम्हाला गरज असतानाही मिळत नाही हे आमचे दुदैव आहे. तसेच धरणातुन सोडलेले आवर्तन हे पाणी साकूर-शिंदोडी पर्यंत येईपर्यंत चालु ठेवावे अशी विनंती आमदार अमोल खताळ पा.यांनी आमदार किरण लहामटे यांना केली होती.

माणुसकीच्या भावनेतुन त्यांनी या भागापर्यंत पाणी येऊ द्यायला हवे होते, परंतु दुदैवाने तसे झाले नाही. याचवर्षी धरणाचे चालु आवर्तन हे साकूर पठारभागाला मिळेल असे फोल आश्वासन आमदार अमोल खताळ व खा.सुजय विखे पा. यांनी कधीही दिलेले नव्हते, आपण या पठारभागाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडवु हाच शब्द त्यांनी निवडणुकीच्या आधीपासुन दिला आहे, परंतु त्यासाठी काही अवधी लागणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या टिकेला काहीही अर्थ नाही.

येत्या काळात या भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभागाच्या वतीने सर्व्हे सुरु असुन पठारभागातील गावांना कायमस्वरुपी शास्वत पाणी देण्यासाठी पालकमंत्री व जलसंपदामंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा.व मा.खा.सुजयदादा विखे पा.व आमदार अमोल खताळ पा.यांच्या मार्गदर्शनात ठोस अशी उपाययोजना केली जाईल, यासाठी उपसा जलसिंचन योजना ई.उपलब्ध पर्यायांचा अभ्यास सुरु आहे व साकूर पठारभागाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी हे सर्व नेते कटिबद्ध आहेत असे रऊफ शेख यांनी स्पष्ट केले आहे.

2 thoughts on “साकूर – शिंदोडीपर्यंत पिंपळगाव खांडचे पाणी का आले नाही, रऊफ शेख यांनी सांगितले कारण….”

  1. आमदार अमोल भाऊ खताळ‌‌ यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. आणि तेच तालुक्याच्या पाणी प्रश्न सोडवतील यांचा विश्वास सर्व जनतेला आहे. विरोधक नैराश्यातून आरोप करत आहेत त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही

    Reply
  2. मा रौफ शेख मतदार संघाचे फेररचनेत वारंवार बदल न करता तालुक्यातील सर्व गट हे तालुक्यातील विधानसभा मतदारसंघला जोडले जातो तेव्हा स्थानिक विधानसभा प्रतिनिधी आपली जबाबदारी टाकून नाही देऊ शकत. वास्तविक पाहता परिस्थिती उद्भवली गेले ती स्थानिक आणि शेजारच्या दोन्ही मंत्र्यांच्या बलाबळ प्रभावाने.आताची परिस्थिती लक्षात घेता पाणी प्रश्न हे भौगोलिकदृष्ट्या उद्भवली जाते त्यासाठी ठोस उपाययोजना कागदावरच न ठेवता परखडपणे प्रत्यक्षात राबविण्यात लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर मोदीजी सारखे ६० वर्षात कांग्रेस चे कागवा करत दशक काढायचे आणि हे पंचवार्षिक निघून जाईल हे जबाबदार ते जबाबदार आहेत बोलण्यात नंतर मात्र विकासाची खरी संकल्पना आभासी असणारया कागदावरच्या वचननाम्यात नसुन भौगोलिकदृष्ट्या दुरदृष्टीने उचलत गेलेल्या प्रत्यक्षपणे राबविण्यात आलेल्या कांग्रेस धोरणात आहे हे जनतेला सहज समजेल.
    मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसुन सखोल विचार करून मत मांडले . भावना दुखावल्या गेल्यास दिलगिरी व्यक्त करतो .
    जय महाराष्ट्र…

    Reply

Leave a Comment