Ahmednagar : निधन, राजीनामा किंवा अन्य कारणामुळे रिक्त असणार्या ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे.
राज्यात अशा प्रकारे 2 हजार 620 ग्रामपंचायतींमध्ये 3 हजार 666 सदस्यांच्या जागा रिक्त असून यात नगर जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायतींमधील 218 सदस्यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त असणार्या जागांसाठी येत्या 18 मे रोजी मतदान होणार आहे.
याबाबतचा निवडणूक कार्यक्रम गुरूवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात राज्यभरात रिक्त असणार्या ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा भरण्यासाठी 18 एप्रिलला संबंधित तालुक्यांचे तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणार आहेत. त्यानंतर 24 एप्रिल ते 2 मे या कालावधीत सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर 3 मे रोजी दाखल अर्जाची छाणनी होणार असून 8 मे रोजी उमेदवारी माघारीसाठीचा कालावधी राहणार आहे.
त्याच दिवशी चिन्हांचे वाटप करून 18 मे रोजी प्रत्यक्षात मतदान घेण्यात येवून 19 तारखेला मतमोजणी घेण्यात येणार आहे.राज्यात अशा प्रकारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीमध्ये 3 हजार 666 सदस्यांची पदे रिक्त असून यात 126 थेट जनतेतून निवडून येणार्या सरपंच यांचा समावेश आहे.
नगर जिल्ह्यात 128 ग्रामपंचायतीमध्ये 128 सदस्यांची पदे रिक्त असून यातील 10 थेट जनतेतून निवडून येणार्या सरपंच यांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 9 मार्चला प्रसिध्द करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
