गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (amol kolhe) हे भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याचे सातत्याने म्हटलं जात आहे.
विविध कारणांमुळे अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जाणार असल्याचे वारंवार बोलले जात असते. अमोल कोल्हे यांनी याबाबत नकार दिला असला तरी भाजप याबाबत मात्र कायमच संदिग्ध भूमिका घेत आली आहे. अशातच आता राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
2019 मध्ये शिरूर येथून आढळराव पाटील निवडणूक लढले. त्यांना अमोल कोल्हे यांनी पाडले. आढळरावांसारखा तीन टर्मचा खासदार असतानाही उद्या कोल्हे भाजपात येणार असले, तर आढळरावांना समजावलंच जाईल की कोल्हे विद्यमान खासदार आहेत.
आम्हाला त्यांना तिकीट द्यावेच लागेल. ते विद्यमान खासदार आहेत. त्यानंतर विषय येईल आणि कोल्हेंना निर्णय घ्यावा लागेल की त्यांनी एकनाथ शिंदेंकडून निवडणूक लढवायची की भाजपाकडून लढायची? मग त्यांना विचारले जाईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
अजित पवार यांनी लगावला टोला
चंद्रकांत पाटील यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit pawar) यांनी पुण्यात माध्यमांसोबत बोलताना याबाबत भाष्य केले आहे. “अनेकदा अशा प्रकारची चर्चा झाली आहे.
चंद्रकांत पाटील राजकारणात आल्यापासून कोण कुठे जाणार याची यादी काढली तर एकूण किती संख्या झाली हे समजणार नाही. कोण वक्तव्य करतं आणि त्या वक्तव्यावरुन त्याला किती महत्त्व द्यायचं हे ठरवा, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
