साकूर – बिरेवाडी रस्त्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर…

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्यांचा विषय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. संगमनेर तालुक्यातील साकूर – बिरेवाडी असा पाच किलोमीटर असणाऱ्या या रस्त्यासाठी सीमेंट काँक्रिटीकरणासाठी ४ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी विधानसभा निवडणुकीपूर्वी मंजूर झाला होता. त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाच भूमिपूजनही झाले होते.

मात्र पाच ते सहा महिने उलटून गेले तरी देखील रस्त्याच्या कामाला शुभारंभ देखील झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठेकेदाराने रस्त्याचे काम का चालू केले नाही? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. मात्र रस्त्याची झालेली दयनीय अवस्था बघता याचा त्रास नागरिक, वाहन चालकांना होत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी बिरेवाडी येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, जर येत्या १५ दिवसांत संबंधित ठेकेदाराने काम चालू केले नाही तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा त्यांनी दिला होता.

मात्र अद्यापही ठेकेदाराने कामच चालू केले नसल्याने पावसामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांनी विळखा घातला आहे. त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडत आहे.

साकूर – बिरेवाडी रस्ता अत्यंत महत्त्वाचा आणि मधला मार्ग समजला जातो. या रस्त्याचा प्रवासी, वाहनचालक मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या कामासाठी मागणी होत होती. मात्र शेवटी या रस्त्यासाठी सीमेंट काँक्रिटीकरण होण्यासाठी  पावणे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. परंतु रस्ता मंजूर होऊनही ठेकेदाराने कामच चालू केले नाही. त्यामुळे ग्रामस्थांसह वाहनचालकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. त्यामुळे आता रस्त्याच काम कधी चालू होणार याचीच उत्सुकता लागली आहे.

Leave a Comment