मुसळधार पावसाचा फटका ; भीषण अपघातात भाजपच्या बड्या नेत्याचा मृत्यू 

बीडमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. सध्या राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाला असून पावसाचा जोर वाढताना दिसत आहेत. या मुसळधार पावसामुळे गाडी स्लिप होऊन भीषण अपघातात भाजपाच्या माजी आमदाराचं निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. दरम्यान, या अपघातात माजी आमदाराचा अंगरक्षक आणि चालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं अपघाती निधन झालं आहे. आर. टी. देशमुख हे तुळजापूरहून औसा, लातूरमार्गे बीडकडे जात होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. पावसामुळे आर. टी. देशमुख यांची गाडी स्लिप झाली आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाली आणि आर. टी. देशमुख गाडीच्या बाहेर फेकले गेले. धक्कादायक म्हणजे सदर गाडी आर. टी. देशमुख यांच्या अंगावर पडली.

या भीषण अपघातात भाजपाच्या माजी आमदारांसह त्यांचा अंगरक्षक आणि चालक गंभीर जखमी झाले होते. भादा पोलीस ठाण्याचे औटपोस्टमधील पोलिसांनी तत्काळ धाव घेत आर. टी. देशमुख यांच्या अंगावरील गाडी काढली. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या आर. टी. देशमुख यांना लातूर येथील सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

मात्र आर. टी. देशमुख यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. सध्या आर. टी. देशमुख यांच्या अंगरक्षक आणि चालकावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आर. टी. देशमुख यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच माजलगाव आणि बाडीमध्ये शोककळा पसरली आहे.

Leave a Comment