कधी निलेश लंकेंच्या घरी गेलायत का? शरद पवारांनी असे म्हणताच सभागृहात एकच…..

मुंबई – निष्ठावंत कार्यकर्ते हे आपल्या पक्षाचा मौल्यवान ठेवा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीची चिंता करु नका. तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंध राहिले आणि आपला विचार पुढे नेला तर सत्ता आपोआप येईल. ती येण्याची स्थिती मला महाराष्ट्रात दिसत आहे. उद्या निवडणुका होतील तेव्हा हे चित्र बघायला मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ते मंगळवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भविष्यात आपली सत्ता येण्याची चिन्हे आहेत, असा आशावाद दिला. यावेळी शरद पवार यांनी अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांचा उल्लेख केला.

तुम्ही अहिल्यानगरच्या खासदारांचं भाषण ऐकले असेल. तुम्ही कोणी कधी त्यांच्या घरी गेलायत का, असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला. त्यावर कार्यकर्त्यांपैकी एकाने, ते (निलेश लंके) कधी आम्हाला घरी बोलवत नाहीत, अशी मिश्कील टिप्पणी केली. तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर शरद पवार यांनी म्हटले की, ते तुम्हाला घरी बोलवत नसतील तर आता ते तुमच्या घरी येतील. त्यांचं घर अक्षरश: एका खोलीचे आहे. या घरात ते रात्री दोन-तीन वाजेपर्यंत लोकांना भेटत असतात. लोकांचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

निलेश लंके यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे आपल्या पक्षाचा मौल्यवान ठेवा आहेत. तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंध राहून विचाराने पुढे येतील तेव्हा सत्ता आपोआप येईल. पक्षातील फुटीची चिंता तुम्ही करु नका. कोण आले कोण गेले, याची चिंता करु नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेविषयी बांधिलकी कायम ठेवली तर काहीही अडचण येणार नाही. सत्ता येण्याची स्थिती मला महाराष्ट्रात दिसत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

Leave a Comment